लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय पक्षांचे झेंडे, पोस्टर हटविण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र काही मुजोर अधिकारी-कर्मचार्यांनी शिवजयंतीसाठी लावलेले घरावरील शिवरायांचे छायाचित्र असलेले झेंडेही उतरण्याची मुजोरी सुरू केली. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी खबरदार...झेंड्याला हात लावाल तर ! माझ्या राजाचा झेंडा हाय ! असे या अधिकार्यांना सुनावले.
निवडणूक आचारसंहिता सुरू झाली तसे प्रशासनाने कठोर अंमलबजावणी करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र ही अंमलबजावणी करताना काही कर्मचारी अधिकारी जाणीवपूर्वक अक्षम्य चुका करीत असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात मराठा समाजाने आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यामुळे समाज जागृत झाला. या आंदोलनादरम्यान समाजाने प्रत्येक घरावर भगवा ध्वज लावण्याची सूचना केली होती. त्यामुळे गावागावातील घरावर शिवरायांचे छायाचित्र असलेला भगवा ध्वज उभारलेला दिसून येतो. समाजाची अस्मिता असलेल्या या झेंड्यालाच हात लावण्याचा प्रयत्न आचारसंहितेच्या नावाखाली होत आहे. आज सकाळपासूनच औरंगाबाद तसेच जालना जिल्ह्यातील काही गावात बीडीओच्या आदेशाने ग्रामसेवक पोहोचले. त्यांनी घरावरील काढून घेण्याचे फर्मान सोडले. राजकीय पक्षांचे ध्वज हटवण्याचे आदेश असताना या मुजोर अधिकार्यांना शिवरायांचे छायाचित्र असलेली ध्वज हटवण्याची दुर्बुद्धी कशी झाली असा सवाल आता उपस्थित होत आहे. हे एक षड्यंत्र तर नाही ना, असाही प्रश्न समाजातील नेते उपस्थित करीत आहेत. आमच्या भावनांशी खेळाल तर बघा असा सज्जड दम अनेक कार्यकर्त्यांनी प्रशासकीय अधिकार्यांना भरला.
याबाबत निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रींगी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी केवळ राजकीय पक्षांचे ध्वज उतरण्याचे आदेश दिले आहेत, असे स्पष्ट केले. याबाबत तक्रार आली तर ंबंधित अधिकारी कर्मचार्यांवर कारवाई करु असा इशाराही त्यांनी सांजवार्ता शी बोलताना दिला आहे.